भंडारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७१६.६५ चौ.कि.मी. असून भौगोलिक क्षेत्र ३,८९,००० हे. आहे. सरासरी पर्जन्यमान १३३०.२० मि.मि. असून २००१ चे जनगणनेनुसार लोकसंख्या ११,३६,१४६ एवढी आहे.
भौगोलिक रचना
जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या शाखातील आंबागड डोंगराची रांग पश्चिम पूर्व जिल्ह्याच्या आग्नेय भागात असून जिल्ह्याच्या मध्य भागात भंडारा शहरापासून गोंदिया शहरापर्यंत गायखुरी डोंगराची रांग आहे. यातील खर्रा पहाडी २००९ फुट, लेंडेझरी १४९० फुट आणि जमनी १७२२ फुट उंच आहेत.
जिल्ह्याच्या उत्तरेला मध्य प्रदेशातील बालाघाट, छिंदवाडा जिल्हा आणि पूर्वेला महाराष्ट्राचा गोंदिया जिल्हा आहे. महाराष्ट्रातील नागपूर व चंद्गपूर जिल्हे अनुक्रमे पश्चिम व दक्षिण दिशेला आहेत. वैनगंगा व बावणथडी नद्यांनी जिल्ह्याच्या उत्तरेची नैसर्गिक सिमा आखलेली असून मुंबई-कोलकाता या महामार्ग क्रमांक ६ वर भंडारा शहर जिल्ह्याचे मुख्यालय वसलेले आहे.
जमीन व कृषि :
भंडारा जिल्ह्यातील मृदा मुख्यतः काळीकन्हार, सिहार, मोरांड, खरडी व बरडी आहे. वैनगंगा नदीच्या काठावरील भागात काळीकन्हार व प्रथम दर्जाची मोरांड जमीन आढळते. ती खोल थराची, चिकट वआर्दता टिकवून ठेवणारी असून त्यात वर्षातून दोनदा पिके घेतली जातात. वैनगंगेच्या खोर्यात वाळू मिश्रीत जमीन आढळते, ती भात पिकास योग्य आहे. मोरांड प्रकारच्या जमिनीमध्ये विशेषतः गहू, ज्वारी व जवस ही पिके घेतली जातात. खरडी व बरडी जमिनीत हलक्या प्रकारचे भाताचे पिके घेतले जाते. हा जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात प्रसिध्द आहे.